भुजंगधारी
तारकासमूह | |
भुजंगधारी मधील ताऱ्यांची नावे | |
लघुरुप | Oph |
---|---|
प्रतीक | साप धारण केलेला |
विषुवांश | १७ |
क्रांती | −८ |
चतुर्थांश | SQ3 |
क्षेत्रफळ | ९४८ चौ. अंश. (११वा) |
मुख्य तारे | १० |
बायर/फ्लॅमस्टीड तारे | ६२ |
ग्रह असणारे तारे | १५ |
३.००m पेक्षा तेजस्वी तारे | ५ |
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे | ११ |
सर्वात तेजस्वी तारा | α Oph (रसलहेग) (२.०८m) |
सर्वात जवळील तारा |
बर्नार्डचा तारा (५.९८ ly, १.८३ pc) |
मेसिए वस्तू | ७ |
उल्का वर्षाव |
ओफयुकिड्स मे ओफयुकिड्स दक्षिण मे ओफयुकिड्स थीटा ओफयुकिड्स |
शेजारील तारकासमूह |
शौरी भुजंग तूळ वृश्चिक धनू गरूड |
+८०° आणि −८०° या अक्षांशामध्ये दिसतो. जुलै महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो. |
भुजंगधारी खगोलीय विषुववृत्तावरील एक मोठा परंतु अंधुक तारकासमूह आहे. टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांपैकी हा एक आहे. याला इंग्रजीमध्ये Ophiuchus (ऑफियुकस) म्हणतात. हे मुळ ग्रीक नाव असून त्याचा अर्थ साप (भुजंग) धारण केलेला असा होतो. याला एक माणूस साप धरत आहे असे दर्शवले जाते ज्यामध्ये साप भुजंग या तारकासमूहाने दर्शवला जातो.
स्थान
[संपादन]भुजंगधारी तारकासमूह हा मुख्यत्वे खगोलीय विषुववृत्ताच्या दक्षिणेस शौरी व तूळ यांच्या दरम्यान असून दक्षिणेकडे हा वृश्चिक व धनू यांच्या दरम्यान क्रांतिवृत्तापर्यंत पसरलेला आहे. याचा काही भाग आकाशगंगेच्या पट्ट्यापर्यंत गेलेला असून त्या भागात तेजोमेघ आणि तारकागुच्छ दिसतात. उत्तर गोलार्धातील उन्हाळ्यात हा नीट दिसतो.
भुजंगधारीचे खगोलावरील क्षेत्रफळ ९४८ वर्ग डिग्री असून हा अकरावा सर्वात मोठा तारकासमूह आहे. हा क्रांति १२° ते दक्षिणेला -३०° पर्यंत पसरला आहे.
वैशिष्ट्ये
[संपादन]तारे
[संपादन]अल्फा ओफयुची हा २.०७ दृश्यप्रतीचा तारा आणि ईटा ओफयुची हा २.४३ दृश्यप्रतीचा तारा हे भुजंगधारीमधील तेजस्वी तारे आहेत.[२] बीटा ओफयुची आणि लॅम्ब्डा ओफयुची हे या तारकासमूहातील इतर तेजस्वी तारे आहेत.[२]
आरएस ओफयुची एक असा तारा आहे ज्याची दीप्ती (तेजस्वीपणा) अनियमित काळाने काही दिवसांमध्ये शंभर पटिंनी वाढते. त्यामुळे या ताऱ्याचा स्फोट होऊन तो १अ प्रकारचा अतिनवतारा बनण्याच्या मार्गावर आहे आहे असे मानले जाते.[३]
बर्नार्डचा तारा हा पृथ्वीपासून दुसरा सर्वात जवळचा तारा आहे. हा तारा या भुजंगधारी तारकासमूहामध्ये आहे. बर्नाडचा तारा पृथ्वीपासून ६ प्रकाशवर्ष अंतरावर आहे. हा बीटा ताऱ्याच्या डावीकडे आणि V आकाराच्या ताऱ्यांच्या समूहाच्या उत्तरेला आहे.
एसएन १६०४ हा अतिनवतारा थीटा ओफयुची जवळ ९ ऑक्टोबर १६०४ साली पहिल्यांदा पाहिला गेला होता. योहानेस केप्लर यांनी त्याला पहिल्यांदा १६ ऑक्टोबर रोजी पाहिले आणि त्याचा अतिशय सखोल अभ्यास केला होता. त्यामुळे त्याला केल्परचा अतिनवतारा असे नाव पडले.
भुजंगधारीमधील जीजे १२१४ या ताऱ्याची तेजस्विता दर १.५ दिवसांनी वारंवार कमी होते, असे २००९ मध्ये जाहीर करण्यात आले. असे तजस्विता कमी होणे हे लहान ग्रहाच्या संक्रमणाशी सुसंगत आहे.[४]
दूर अंतराळातील वस्तू
[संपादन]भुजंगधारीमध्ये आयसी ४६६५, एनजीसी ६६३३, एम९, एम१०, एम१२, एम१४, एम१९, एम६२ आणि एम१०७ यांसारखे अनेक तारकागुच्छ आणि आयसी ४६०३-४६०४ यासारखे तेजोमेघ आहेत.
एम१० हा एक जवळचा गोलाकार तारकागुच्छ आहे. तो पृथ्वीपासून २०,००० प्रकाशवर्ष अंतरावर आहे. त्याची दृश्यप्रत ६.६ आहे.[५]
एनजीसी ६२४० ही एक असामान्य दीर्घिका या तारकासमूहामध्ये आहे. दोन दीर्घिकांच्या विलीनीकरणातून ही दीर्घिका तयार झाली आहे. ४० कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील फुलपाखराच्या आकारातील या दीर्घिकेमध्ये एकमेकांपासून ३००० प्रकाशवर्ष अंतरावर दोन कृष्णविवरे आहेत. दोन कृष्णविवरांच्या अस्तित्वावर चंद्रा क्ष-किरण दुर्बिणीतून मिळालेल्या वर्णपटाच्या आधारे शिक्कमोर्तब झाले. ही कृष्णविवरे आणखी एक अब्ज वर्षांनी एकमेकांत विलीन होतील असा अंदाज आहे. या दीर्घिकेमध्ये ताऱ्यांच्या निर्मितीचा दरदेखील असामान्य रीत्या जास्त आहे. याचे संभाव्य कारण टक्करीनंतर निर्माण झालेली उष्णता आहे.[६]
बर्नार्ड ६८ हा पृथ्वीपासून ४१० प्रकाशवर्ष अंतरावरील एक कृष्ण तेजोमेघ आहे. ०.४ प्रकाशवर्ष व्यास असूनसुद्धा याचे वस्तुमान फक्त सूर्याच्या दुप्पट आहे. त्यामुळे हा अतिशय विरळ आणि थंड तेजोमेघ आहे (तापमान: १६ केल्व्हिन). सध्या जरी हा तेजोमेघ स्थिर असला, तरी कालांतराने यामध्ये नवीन ताऱ्यांची निर्मिती सुरू होईल. बर्नार्ड ६८ चे एक असामान्य वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यातील कंपने ज्यांचा आवर्तीकाळ २,५०,००० वर्ष आहे. खगोलशास्त्रज्ञ असा तर्क लावतात की ही गोष्ट एका अतिनवताऱ्यामुळे निर्माण झालेल्या आघात लहरींमुळे होत आहे.[६]
भुजंगधारी आणि राशिचक्र
[संपादन]भुजंगधारी हा क्रांतिवृत्तावरून जाणाऱ्या १३ तारकासमूहांपैकी एक आहे.[७] त्यामुळे याला तेरावी रास असेही म्हणले जाते. त्यामुळे रास व तारकासमूह यामध्ये गोंधळ होतो.
राशिचक्रातील राशी या क्रांतिवृत्ताचे बारा समान भाग आहेत ज्यामुळे प्रत्येक रास खगोलीय रेखावृत्तावर ३०° भाग व्यापते. हे अंतर अंदाजे सूर्याने एका महिन्यामध्ये कापलेल्या अंतराएवढे आहे.
सर्व तारकासमूह आकारमानाने एकसारखे नाहीत आणि त्यांचे आकाश व्यापणे हे ताऱ्यांच्या स्थानांवर अवलंबून आहे. तारकासमूहांचा आणि राशिचक्रातील राशींचा फारसा संबंध नाही आणि या दोन गोष्टी सामान्यत: एकमेकांशी जुळत नाहीत.
संदर्भ
[संपादन]- ^ Allthesky.com
- ^ a b चार्ट्रंड III, मार्क आर. स्कायगाईड: अ फिल्ड गाईड फॉर ॲमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमर्स (इंग्रजी भाषेत). p. १७०.
- ^ पीज, रोलॅंड. "स्टार 'सून टु बिकम सुपरनोव्हा'" (इंग्रजी भाषेत).
- ^ Charbonneau, David; et al. (December 2009). "A super-Earth transiting a nearby low-mass star". Nature (इंग्रजी भाषेत). 462: 891–894. arXiv:0912.3229. Bibcode:2009Natur.462..891C. doi:10.1038/nature08679. PMID 20016595.
- ^ लेव्ही २००५, पाने. १५३-१५४.
- ^ a b जेमी विल्किन्स; रॉबर्ट डुन. ३०० ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स: अ व्हिजुअल रेफरन्स टु द युनिव्हर्स. Buffalo, New York.
- ^ Shapiro, Lee T.; "Constellations in the zodiac", in The Space Place (NASA, last updated 22 July 2011)
स्रोत
[संपादन]- Levy, David H. (2005). Deep Sky Objects. Prometheus Books. ISBN 1-59102-361-0.CS1 maint: ref=harv (link)Deep Sky Objects. Prometheus Books. ISBN 1-59102-361-0.
- Ridpath, Ian; and Tirion, Wil; (2007) Stars and Planets Guide, Collins, London, ISBN 978-0-00-725120-9, Princeton University Press, Princetonm, ISBN 978-0-691-13556-4
- Zic, Klaudio; (2011) True Zodiac: True Ascendant, NOOK Book, ISBN 1257550268